मोखाडा तालुका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेला असून मोखाडा तालुक्याचे ठिकाण 90 कि.मि.अंतरावर आहे. या तालुक्याची बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार मोखाडा तालुक्याची लोकसंख्या 83,453 इतकी आहे. त्यापैकी ग्रामीण लोकसंख्या-73,180 व शहरी (नगरपंचायत-मोखाडा) लोकसंख्या – 10273 इतकी आहे. त्यामध्ये पुरुष-41691 व स्त्रिया-41762 एवढी आहे. अनुसूचित जमाती ग्रामीण लोकसंख्या – 69164 व शहरी नगरपंचायत लोकसंख्या – 7678 व अनुसूचित जाती ग्रामीण लोकसंख्या – 1447, शहरी नगरपंचायत लोकसंख्या-175 व इतर ग्रामीण लोकसंख्या-2569 आणि शहरी नगरपंचायत लोकसंख्या-2420 इतकी आहे.
या तालुक्याचा बहुतेक भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-यांचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 47308.42 हेक्टर आहे. तालुक्यातील सरासरी 2500 ते 3000 मी.मी.इतके पर्जन्यमान आहे. तालुक्याचे मुख्यालय मोखाडा असून ते समुद्र सपाटी पासून 1600 फुट उंचावर वसलेले आहे. या तालुक्यात 27 ग्रामपंचायती असून त्यामध्ये 59 महसुल गावे आहेत. मोखाडा तालुका अंतर्गत जिल्हा परिषद गट- 03 व पंचायत समिती निर्वाचण गण- 06 आहेत. मोखाडा तालुक्याच्या पुर्वेस नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुका आहे. मोखाडा तालुक्याच्या पश्चिमेला जव्हार तालुका, दक्षिणेला वाडा तालुका, व उत्तरेस नाशिक जिल्हा व गुजरात राज्याची सीमा आहे.
या तालूक्यात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तिन्हीही ऋतु प्रकर्षाने जाणवतात. या तालुक्याचा बहुतेक भाग डोंगराळ व द-याखो-यांचा असल्याने या ठिकाणी भात,नागली,वरई ही प्रमुख पिके घेण्यात येत असून त्याच बरोबर तुर, उडीद व खुरासणी इत्यादी पिकेही घेतली जातात. तसेच पुरक शेती म्हणून मोगरा लागवड, फुलशेती, वांगी, मिरची, टोमॅटो, काजू, आंबा, तुती व अलीकडे स्टॉबेरीची ही लागवड केली जाते. तालुक्यामध्ये खोच, पळसपाडा, मध्यवैतरणा धरणे आहेत. या तालुक्यात मोखाडा येथे रंगपंचमीला बोहाडा उत्सव यात्रा भरवली जाते. तसेच मोखाडा तालुक्यामध्ये देवबांध येथे प्राचीन गणेश मंदिर, हनुमान मंदिर मोखाडा, विठ्ठल मंदिर मोखाडा, जगदंबामाता मंदिर मोखाडा व प्राचीन शिव मंदिर ओसरविरा ही देवस्थाने आहेत. तसेच ऐतिहासिक स्थळे वाशाळा येथे पांडवलेणी व सुर्यमाळ येथे निसर्गोपचार केंद्र आहे. या तालुक्यामध्ये वारली, कोकणा, कातकरी, ढोरकोळी, क.ठाकुर, म.ठाकुर व महादेव कोळी ह्या आदिवासी समाजाची संख्या मोठया प्रमाणावर आहे.
भौगोलिक व नैसर्गिक वैशिष्ट्ये
मोखाडा हा सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेला आहे.
येथे घनदाट जंगलं असून अनेक छोटी मोठी नद्या वाहतात.
परिसरातील प्रसिद्ध जलाशय – वैतरणा डॅम आणि मोलगी डॅम.
हा भाग जैवविविधतेने समृद्ध असून येथे बिबट्या, हरणं आणि विविध पक्ष्यांचे प्रकार आढळतात.
शेती आणि अर्थव्यवस्था
मुख्यतः पावसाळी शेतीवर अवलंबून असलेला भाग आहे.
तांदूळ, नागली (नाचणी), वरई ही मुख्य पीकं घेतली जातात.
येथील काही भागात आंबा, काजू आणि कोंकणी भाजीपाला उत्पादित होतो.
आदिवासी समाज वनउत्पन्नांवर आणि मजुरीवरही अवलंबून असतो.
संस्कृती व परंपरा
आदिवासी गोंधळ, तारपा नृत्य, आणि होळी-सिमगा हे पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
वारली चित्रकला हा इथल्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.
इतिहास
मोखाडा तालुका हा ब्रिटीश कालखंडात निर्माण करण्यात आलेला असून मोखाडा तालुका मुख्यालयाची तहसील कार्यालयाची नवीन इमारत 2021 साली बांधण्यात आलेली आहे.
सांस्कृतिक वारसा
मोखाडा तालुक्यात प्रामुख्याने वारली, कोकणा, क-ठाकुर, म-ठाकुर, महादेव कोळी, ढोर कोळी, कातकरी, आदिवासी जमाती आहेत.
आदिवासी सामाजाने आपला सांस्कृतिक वारसा जपला असून त्यामधील वारली चित्रकला व तारपा नृत्य, ढोल नाच हि त्यांच्या समाज जीवनाची ओळख आहे. वारली चित्रकारी आदिम काळापासून म्हणजे जेव्हा मनुष्य वास्तव्य करीत होता त्या काळापासून म्हणजे साधारपणे 1100 वर्षापासून जतन केलेली आहे या चित्रकलेमधे आदिवासी समाज्याच्या विविध चालीरीती तसेच दैनंदिन होणाऱ्या घडामोडी,आदिवासींच्या दैनंदिन जीवनात होणारे प्रसंग उदा. लग्न ,नृत्य विविध सण निसर्गातील घडामोडी अशा प्रकारचे प्रसंग उत्तम प्रकारे चित्ररूपाने दाखवले जातात. हि चित्रे कुठल्याही प्रकारचा रासायनिक रंग न वापरता निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तू ,उदा. माती ,तांदळाचे पीठ, वनस्पतीजन्य रंग व बांबूच्या काड्यांचे ब्रुश वापरून काढली जातात. हि कला आदिवासींच्या जीवनशैलीच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकणारी चित्रकला असून या चित्रकलेला भारतात तसेच परदेशात खूप मागणी आहे.
भौगोलिक माहिती
भौगोलिक क्षेत्रफळ | 473.0842 चौ.किमी. |
हवामान | उष्ण व सम |
लोकसंख्या | 83,453 (2011 च्या जनगणनेनुसार) |
लगतचे तालुके व जिल्हे | पश्चिमेला – जव्हार तालुका
दक्षीणेस:- वाडा तालुका उत्तर – नाशिक जिल्हा व गुजरात राज्याची सीमा पश्चिम- पालघर |
मोखाडा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 2500 मि.मि. एवढे आहे.
मोखाडा तालुक्यात काही: डोंगर असून बराचसा भाग वनव्याप्त आहे. तसेच सपाट जमिन आहे.
मोखाडा तालुक्याची सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 83,453 एवढी आहे.
मोखाडा तालुका शेजारील तालुक्यांशी रस्ते या मार्गाने जोडलेला आहे. मोखाडा तालुक्यातून डहाणु – नाशिक हा महामार्ग जात आहे.
औद्योगिक वसाहती
मोखाडा तालुक्यात औद्योगिक वसाहती तसेच मोठे, मध्यम व लघु उद्योग नाहीत.
या भागात प्रामुख्याने भात व नागली यांची शेती केली जाते तसेच आलिकडच्या काळात हळद लागवडीचा प्रयोग देखिल यशस्वी झालेला आहे. याशिवाय जंगलातील लाकुडफाटा गोळा करणे व जंगलातील मध, लाख व औषधी वनस्पती इत्यादी गौण उत्पादाने गोळा करणे हा देखिल व्यवसायाचा एक भाग आहे.