जव्हार गाव हे शहरी असून सन 1918 मध्ये जव्हार नगरपरिषद अस्तित्वात आली. तालुक्याचा बहुतेक भाग हा सह्याद्रीचे पठाराचा भाग असून सर्वत्र डोंगर टेकडया व लहान मोठया नदयांनी व्यापलेला आहे. जव्हार तालुका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेला असून जव्हार तालुक्याचे ठिकाण पालघर पासून 70 कि.मि.अंतरावर आहे. जव्हार तालुक्याचे पूर्वेला मोखाडा तालुका, पश्चिमेला डहाणू, दक्षिणेस वाडा तालुका व उत्तरेस तलासरी तालुका व गुजरात राज्याची सीमा आहे. जव्हार तालुक्याची बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बहुतेक भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-याचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 85806 हेक्टर त्यापैकी साधारणत: भात, नागली, वरई ही प्रमुख पीके असून त्याच बरोबर तुर, उडीद व खुरासणी इत्यादी पिके घेतली जातात. तसेच पुरक शेती म्हणून मोगरा लावगवड, फुलशेती, वांगी, मिरची, टोमेटो, काजू, आंबा व तुती यांची लागवड केली जाते.तालुक्यातील सरासरी 2500 ते 3000 मी.मी. इतके पर्जन्यमान असून तालुक्याची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणना नुसार 1,40,187 आहे. जव्हार तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण 57.42 % आहे. वाडा तालुक्यात एकुण 3 महसूल मंडळे असून त्यात जव्हार, जामसर, साखरशेत या मंडळाचा सामावेश आहे.
तालुक्याचे ठिकाण जव्हार असून ते समुद्र सपाटी पासुन 1600 फुट उंचावर वसलेले आहे. या तालुक्यात 2 ग्रामदान मंडळ व 48 ग्रामपंचायती असून 109 महसुल गावे आहेत. त्यामध्ये 1 ओसाड गाव आहे.
तालुक्यामध्ये खडखड धरण व जव्हार संस्थानचे राजे यांनी स्वखर्चाने उभारलेले जयसागर धरण आहे. जयसागर व खडखड धरणामधुन जव्हार शहरास व आजुबाजूच्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा, डोंमविहीरा ही पर्यटन स्थळे प्रसिध्द आहेत. जव्हार तालुका प्रामुख्याने धबधब्यांचा तालुका म्हणून नावारुपास आला असून कोकणातील महाबळेश्वर म्हणूनही तालुक्याची ओळख कायम आहे.
जव्हार संस्थान हे स्वातंत्र्यापूर्वी मुंबई इलाख्यातील एकमेव संस्थान होते. जव्हार संस्थानचे राजघराणे हे महादेव कोळी समाजाचे होते, त्यामुळे बोलीभाषेत महादेव कोळ्यांचे साम्राज्य – जयहर असे पण म्हणले जाते. या संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे हे होते. जव्हार तालुक्यात मुकणे घराण्याचा राजवाडा आजहि दिमाखात उभा आहे.
जव्हार तालुक्यातील बाळकापरा व देवतळी जामसर येथे महाशिवरात्री च्या दिवशी यात्रा भरत असते, त्यानिमित्ताने मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी जव्हार मार्गे जात असताना भेट दिलेले शिरपामाळ हे ठिकाण आजही मानाचे स्थान आहे.
जव्हार तालुक्यात आदिवासी लोकसंख्या आहे. वारली चित्रकला व तारपा नृत्य ही तालुक्याची सांस्कृतिक ओळख आहे.