- जव्हार तालुक्याविषयी थोडक्यात माहिती
जव्हार उविभागात जव्हार व मोखाडा या दोन तालुक्यांचा समावेश असून दोन्ही तालुके आदिवासी बहलु तालुके आहेत व बहुतेक भाग डोंगराळ आहेत.
जव्हार गाव हे शहरी असून सन 1918 मध्ये जव्हार नगरपरिषद अस्तित्वात आली. तालुक्याचा बहुतेक भाग हा सह्याद्रीचे पठाराचा भाग असून सर्वत्र डोंगर टेकडया व लहान मोठया नदयांनी व्यापलेला आहे. जव्हार तालुका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेला असून जव्हार तालुक्याचे ठिकाण पालघर पासून 70 कि.मि.अंतरावर आहे. जव्हार तालुक्याचे पूर्वेला मोखाडा तालुका, पश्चिमेला डहाणू, दक्षिणेस वाडा तालुका व उत्तरेस तलासरी तालुका व गुजरात राज्याची सीमा आहे. जव्हार तालुक्याची बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बहुतेक भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-याचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 85806 हेक्टर त्यापैकी साधारणत:भात, नागली, वरई ही प्रमुख पीके असून त्याच बरोबर तुर, उडीद व खुरासणी इत्यादी पिके घेतली जातात.तसेच पुरक शेती म्हणून मोगरा लावगवड, फुलशेती, वांगी, मिरची, टोमेटो, काजू, आंबा व तुती यांची लागवड केली जाते.तालुक्यातील सरासरी 2500 ते 3000 मी.मी. इतके पर्जन्यमान असून तालुक्याची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणना नुसार 1,40,187 आहे.
- मोखाडा तालुक्याविषयी थोडक्यात माहिती
मोखाडा तालुका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेला असून मोखाडा तालुक्याचे ठिकाण 90 कि.मि.अंतरावर आहे. या तालुक्याची बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार मोखाडा तालुक्याची लोकसंख्या 83,453 इतकी आहे. त्यापैकी ग्रामीण लोकसंख्या-73,180 व शहरी (नगरपंचायत-मोखाडा) लोकसंख्या – 10273 इतकी आहे. त्यामध्ये पुरुष-41691 व स्त्रिया-41762 एवढी आहे. अनुसूचित जमाती ग्रामीण लोकसंख्या – 69164 व शहरी नगरपंचायत लोकसंख्या – 7678 व अनुसूचित जाती ग्रामीण लोकसंख्या – 1447, शहरी नगरपंचायत लोकसंख्या-175 व इतर ग्रामीण लोकसंख्या-2569 आणि शहरी नगरपंचायत लोकसंख्या-2420 इतकी आहे.
या तालुक्याचा बहुतेक भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-यांचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 47308.42 हेक्टर आहे. तालुक्यातील सरासरी 2500 ते 3000 मी.मी.इतके पर्जन्यमान आहे. तालुक्याचे मुख्यालय मोखाडा असून ते समुद्र सपाटी पासून 1600 फुट उंचावर वसलेले आहे. या तालुक्यात 27 ग्रामपंचायती असून त्यामध्ये 59 महसुल गावे आहेत. मोखाडा तालुका अंतर्गत जिल्हा परिषद गट- 03 व पंचायत समिती निर्वाचण गण- 06 आहेत. मोखाडा तालुक्याच्या पुर्वेस नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुका आहे. मोखाडा तालुक्याच्या पश्चिमेला जव्हार तालुका, दक्षिणेला वाडा तालुका, व उत्तरेस नाशिक जिल्हा व गुजरात राज्याची सीमा आहे.
- जव्हार तालुका इतिहास
जव्हार संस्थान हे इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत अस्तित्वात होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान मुंबई इलाख्यात विलीन झाले जव्हार संस्थान हे ठाणे क्षेत्रातील हे एकमेव संस्थान होते. जव्हार संस्थानचे राजघराणे हे महादेव कोळी समाजाचे होते, त्यामुळे बोलीभाषेत महादेव कोळ्यांचे साम्राज्य – जयहर असे पण म्हणले जाते. या संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे हे होते.
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्रंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया 1 डिसेंबर 1661ला जव्हारचे नरेश पहिले विक्रमशहा यांना भेटावयास आले.विक्रमशहा यांनी जव्हारच्या जवळच असलेल्या एका टेकडीवर मोठा शामियाना उभारला होता. येथे मोठा दरबार भरवण्यात आला होता. शिवाजी महाराज आणि विक्रमशहा यांच्यात तहाची आणि मैत्रीची बोलणी झाली. यानंतर स्वतः विक्रमशहा यांनी शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपात मानचा तुरा रोवला होता. ते ठिकाण म्हणजे आजचे शिरपामाळ होय.
- मोखाडा तालुका इतिहास
मोखाडा तालुका हा ब्रिटीश कालखंडात निर्माण करण्यात आलेला असून मोखाडा तालुका मुख्यालयाची तहसील कार्यालयाची नवीन इमारत 2021 साली बांधण्यात आलेली आहे.